भारतीय संस्कृतीत गणरायाचे सर्वोच्च स्थान आहे.आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप माहिती आहे.परंतु, नेरपरसोपंत तालुक्यातील ऐतिहासिक दुर्लक्षित जवळगाव येथे प्राचीन व दुर्मिळ गणेशाची चतुर्मुखी पुरातन मूर्ती आढळली आहे. विदर्भात अशा तीनच प्रतिमा असल्याने याला प्राचीन काळात विशेष महत्त्व असावे.म्हणून याबाबत पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज आहे.नेर
तालुक्याला मोठा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत असून, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत तालुक्यातील जवळगांव येथे प्राचीन गणेशाची आढळलेली प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून, एकाच पाषाणात चार गणपती मूर्ती कोरलेल्या आहेत. अशा मूर्ती ला मूर्ती शास्त्रात सर्वतोभद्रा असे म्हणतात. जवळगांव येथील मूर्ती याच प्रकारातील असून उत्तमस्थितीत असून पूर्वी उघड्यावर असलेली मूर्तीची स्थापना गावातील लोकांनी छोटेशा मंदिरात स्थापन केली. काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती अंदाजे सातशे ते आठशे वर्षेपूर्वीची असावी.चारहीमूर्ती चर्तुहस्त असून हातात हस्तीदंत,परशु,अंकुश,मोदक तसेच मूर्तीच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेले कोरीव,व भव्य मुकूट आहेत. उदरावर सर्पउदरबंध,हाताला केयूर व बाजूबंध आहेत. वाटसरूंना चारदिशा दर्शविण्यासाठी अशा मूर्तीची स्थापना प्राचीन काळात करण्यात येत असल्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीतील चतुस्पदीचे गणपतीचा उल्लेख यावरूनच येत असावा असे जाणकारांचे मत आहे.
या मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी शिवालय असून श्री. विष्णू व गणेश मंदिराचे अवशेष आहेत परंतु श्री. विष्णू व गरुड मूर्ती गावाच्या पश्चिमेला असलेल्या हेमाडपंथी मंदिरात स्थानांतरित केलेली आहे.याशिवाय गावात भवानी मातेचे अर्धेपीठ असल्याचे सांगितले जाते. संदर्भ सकाळ /31.8.2020