वंदू श्री गणेशा

वंदू श्री गणेशा

Friday, 10 October 2025

वंदू श्री गणेशा

·         श्री गणेश सिद्धेश्वर मंदिर, राहाटगांव,अमरावती

·        

अमरावती पासून १० किमीवर व अमरावती नागपूररोडवर सिद्धेश्वराचे (महादेवाचे) पुरातन मंदिर आहे त्या मंदिरतील श्री गणेशाची मूर्ती

Saturday, 27 September 2025

'अष्टभुज', 'जागृत', 'स्वयंभू' महागणपती, बहिरम जि. अमरावती अमरावती शहरापासून उत्तरेस परतवाडा-बैतुल मार्गावर पासष्ट किलोमीटर अंतरावर तर परतवाडा पासून अठरा कि.मी अंतरावर चांदुर बाजार तालुक्यात असलेले बहिरम देवस्थान आहे. ह्या क्षेत्राला पौराणिक महत्व असून प्राचीन काळातील शक्तीपीठ असावे आणि अनेक ऋषीमुनींचे वास्तव्याचे ठिकाण असल्याचे जाणवते. वऱ्हाड प्रांताच्या अचलपूर परिसरात वाकाटक, राष्ट्रकूट व यादव या राजवंशांचे राज्य होते. त्यांतील वाकाटक व राष्ट्रकूट हे राजवंश भगवान शंकराचे भक्त होते. बहिरम देवस्थान परिसरात असलेल्या भांडे तलावानजीक असलेले प्राचीन शिवलिंग ही त्या इतिहासाची साक्ष देते. अमरावती जिल्ह्यातील कौडिंण्यपूरचा संदर्भसुद्धा बहिरमशी जोडला जातो. भगवान श्रीकृष्ण व कौडिंण्यपूर राजा रुख्मी यांच्या दरम्यान युद्ध झाले होते. तेव्हा बलराम यांच्या सैन्यात गवळ्यांचा समावेश होता. ते सैनिक म्हणजेच गवळी वऱ्हाडात थांबले. ते गवळी बांधव बहिरम डोंगराच्या पायथ्याशी हेटी करून राहू लागले. त्या हेटीचे गवळ्यांच्या गावात रूपांतर झाले ! त्या तीर्थस्थळावर बहिरमबुवाची म्हणजेच भैरवाची भव्यदिव्य मूर्ती बघण्यास मिळते. येथील बहिरमबुआच्या पौष महिन्यातील कृष्णपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व असते. यात्रा आणि चतुर्थी हा योग येतो तेव्हा भाविक भक्तांची गर्दी जास्त असते. येथील गणेशमूर्ती ही सात फूट उंच असून एका भल्या मोठ्या पाषाणावर साकारलेली आहे. शेंदूरचर्चीत अष्टभूजाधारी मूर्तीच्या सात हातात पाश, अंकुश, अपूप, परशू, दत्त, वलय तथा अंगठी अशी सात आयुध व आठवा हात नृत्यार्थ रिकामा आहे. मूर्ती उभ्याने नृत्यमुद्रेत आहे, डावा पाय वाकलेला आणि पद्मासनावर टेकविलेला आहे. उजवा पाय किंचित वाकवून मोकळा सोडला आहे. महान तपस्वी राजयोगी भावसिंह राजाच्या कालखंडातील मूर्तीच्या आजूबाजूला रिद्धी-सिद्धी आहेत. गणेशाचे असे नितांत सुंदर, तेजोमय रूप तसेच वैभवशाली मनमोहक अशी मूर्ती कुठे पाहावयास मिळणार नाही. तसेच मूर्तिवरील दागदागिने, हातातील शस्त्रे, मूर्तीभोवती असलेली नागदेवता व वाहन असलेले मूषकराज यामुळे मूर्तीचे रूप अजून खुलून दिसते. भक्तगण गणेशमूर्तीची भक्तीभावाने पूजा करतात. हा गणपती भक्तांच्या श्रध्देला पावणारा असल्यामुळे तिथे श्रद्धाळू नवस बोलून अभिषेक करतात. श्रीक्षेत्र बहिरम येथील अष्टभुज गणपती मंदिर असून या मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वतःभोवती फिरते असे मानले जाते आणि हे मंदिर विदर्भातील एक महत्त्वाचे शक्तीपीठ मानले जाते. 10 डिसेंबर 2000 मध्ये या गणेश मंदिराचा जिर्णोद्वार भक्त मंडळींनी केला.

Thursday, 20 January 2022

द्विभुज गणपती

रेड्डी चा द्विभुज गणपती 
सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका मायनिंगच्या कंपनीमध्ये कामाला होता. ८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ठ ठिकाणी झोपले असताना पहाटेच्या सुमारास त्यांना स्वप्न पडले. सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी आपली मूर्ती असल्याचा गणपतीने दृष्टांत दिला. त्यानुसार, कांबळी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथे खोदकाम सुरू केले आणि खोदताना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा भाग व कानाचा भाग आढळून आला. एका महिन्यानंतर, १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसू लागली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुसऱ्या हातात मोदक आहे. गणपतीच्या समोर एक भला मोठा उंदीरही आहे. तोही याच खोद कामात सव्वा महिन्यांनी सापडला. द्विभुज ही गणपतीची भव्य दिव्य, आकर्षक व प्रसन्न मूर्ती सर्वच भक्तांना भाराऊन टाकते. ही गणपतीची मूर्ती पांडवकालीन असावी,